अमरावती - आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे तेलगू देसमचे मंत्री गुरुवारी (8 मार्च) राजीनामा देणार आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी (7 मार्च)रात्री उशीरा ही घोषणा केलीय. तेलगू देसम पक्षाचे केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री आहेत. नायडूंच्या या घोषणेनंतर हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी गुरुवारी राजीनामा देतील.
चंद्राबाबू यांनी असे ट्विट केले आहे की, केंद्र सरकार आमचे म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मला माहीत नाही आम्ही काय चूक केली, पण ते लोक निरर्थक बोलतायत. मी आमचा निर्णय मोदींना सांगण्यासाठी गेलो होते. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आम्ही गेली चार वर्षं संयम बाळगला. मी अनेकदा सर्व प्रकारे केंद्र सरकारला समजावण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प मांडल्यापासून आम्ही केंद्राकडे आंध्राला विशेष दर्जा देण्याची मागणी केली होती. पण केंद्रानं आमची दखल घेतली नाही. त्यामुळे एनडीए आणि केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत आणि तो आमचा अधिकार आहे. तेलुगू देसम पक्षाचे केंद्रातील मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी हे गुरुवारी राजीनामा देणार आहे, असेही चंद्राबाबूंनी स्पष्ट केलं आहे.
शिवाय, आंध्र प्रदेश पुनर्रचनेच्या 2014 च्या कायद्यात तसंच संसदेत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न होणे हा राज्याच्या जनतेच्या भावनांचा अपमान असल्याची टीकादेखील नायडू यांनी केंद्र सरकारवर केली होती.
केंद्र सरकारने आंध्र राज्याला विशेष दर्जा दिला नसल्यानंच तेलुगू देसम पक्ष रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बाहेर पडण्याची धमकी दिल्यानंतर सत्तारूढ भाजपाने आंध्रच्या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवले होते. यापूर्वी रालोआची सत्ता असलेल्या राज्यांच्या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: जात होते. पण त्यावेळी ते अन्य कामात गुंतलेले असल्याने आंध्रच्या भावनांना आवर घालण्यासाठी स्वत: व्यंकय्या नायडू परिषदेत उपस्थित राहिले. यावेळी व्यंकय्या नायडूंनी चंद्राबाबूंशी चर्चा केली आणि चर्चेचा वृत्तांत पंतप्रधानांना कळवला. त्यानंतर चंद्राबाबू नायडूंची समजूत घालण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांना पाठवले होते.