ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 15 - देवाचं दर्शन घेण्यासाठी, गा-हाण मांडण्यासाठी, नवस पुर्ण झाला की.. अशा काही ना काही कारणासाठी आपण मंदिरात जात असतो. देवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर पडताना प्रसादही वाटला जात असतो. मात्र एखाद्या मंदिरात तुम्ही पाया पडून बाहेर आलात आणि प्रसाद म्हणून तुम्हाला चक्क सोने, चांदीचे दागिने दिले तर...असं कसं काय शक्य आहे ? असाच विचार करत असाल ना. आपला भारत विविध गोष्टींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे, मग तिथे हे अशक्य कसं काय असेल.
मध्यप्रदेशातील रतलाममध्ये असलेल्या महालक्ष्मी मंदिरात गेले असता तुम्हाला प्रसादात दागिने दिल्यास आश्चर्यचकित होऊ नका. कारण या मंदिरात काही दिवसांसाठी दरबार भरवला जातो, यावेळी दर्शनासाठी येणा-या भक्तांना सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख दिली जाते. या मंदिरात वर्षभर भक्तांची गर्दी होत असते.
भक्त आपापल्या श्रद्धेनुसार देवीला सोने - चांदी अर्पण करत असतात. खासकरुन धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या वेळी भक्तांकडून मोठ्या प्रमाणात सोने, चांदी दान केले जाते. या प्राचीन मंदिरात रोख, दागिने दान करण्याची परंपराच राहिली आहे. दान करण्यात आलेल्या पैशांचा आणि दागिन्यांचा पुर्ण हिशोब ठेवला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात सीसीटीव्ही लावण्यात आले असून पोलिसांचाही कडक पहारा असतो.
महालक्ष्मीचं हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. येथे येणारा भक्त कधीच मोकळ्या हाती जात नाही असा लोकांचा विश्वास आहे. येथे प्रसाद म्हणून मिळणारे दागिने, रोख लोक जपून ठेवतात. असं केल्याने घरात सुख समृद्धी नांदते असा त्यांचा विश्वास आहे.