बंगळुरू - कर्नाटकमध्ये एक मस्जिद फोडल्यानंतर तेथे मंदिर आढळून आल्याची बातमी ट्विटरद्वारे व्हायरल झाली होती. कर्नाटकमधील रायचूर येथे रस्ते रुंदीकरण करताना एका मस्जिदला पाडण्यात आले. त्यावेळी हे मंदिर दिसून आले, त्यामुळे सर्वच मस्जिदींना पाडण्याची गरज असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले होते. अनेक ट्विटर युजर्संने हे फोटो तशाच संदेशासह शेअर केला होता. रमानी परशुरामन यांनी सर्वप्रथम फेसबुकवरुन हा फोटो शेअर केला होता.
ट्विटर अकाऊंटवर दिसत असलेल्या या छायाचित्रातील उजव्या बाजूवर चंद्रा कलरिस्ट (chandra colourist) चा लोगो दिसत आहे. यावरुन हे छायाचित्र म्हणजे एखाद्या कलाकाराची कलाकारी असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे चंद्रा कलरिस्ट नावाच्या फेसबुक अकाऊंटची माहिती घेतल्यानंतर हे सत्य समोर आले आहे. 8 मे 2016 रोजी या अकाऊंटवरुन हे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते. याबाबत एका युजर्सने विचारलेल्या प्रश्नावर चंद्रा कलरिस्ट यांनी ही एक डिजीटल कलाकारी असल्याचे उत्तरादाखल म्हटले होते. त्यामुळे मस्जिद पाडल्यानंतर हे मंदिर आढळून आल्याचा हा दावा खोटा असून हे छायाचित्र म्हणजे एक डिजिटल कलाकारी असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, गुगलवर सर्च केल्यास 12 एप्रिल 2016 रोजी मेईकियानबाओ (Meiqianbao) यांनी क्लिक केलेला एका फोटो आढळून आला आहे. चंद्रा यांनी कदाचित या चित्राचा आधार घेऊनच ही डिजिटल कला साकारली आहे.
दरम्यान, अमेरिकेतील फोटो स्टॉक एजन्सीच्या शटरस्टॉक (Shutterstock) अनुसार – लाँगमेन ग्रोट्टो (Longmen Grottoes) यांचे हे छायाचित्र चीन च्या हेनान येथील लुओयांग स्थितफेंग्जियांग मंदिरातील बौद्ध पाषाणाचे(Fengxiang temple stone Buddhas) आहे.