नवी दिल्ली- रेल्वे रूळावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या पाण्याच्या ठिकाणी सेल्फीचा नाद अनेकांना भोवल्याची बरीच उदाहरणं आपण रोज पाहतो आहे. असाच एक प्रकार दिल्लीमध्ये घडला आहे. रेल्वे रूळावरून जाताना इअरफोन्स लावून गाणी ऐकत तसंच मध्येच सेल्फी काढण्याच्या नादाने एका तरूणाचा जीव गेला आहे. दिल्लीच्या वेलकम रेल्वे स्टेशनच्या रूळावरून हा तरूण जात होता. कानात मोठ्या आवाजात गाणी सुरू असल्याने गाडीचा हॉर्न त्या तरूणाला ऐकु आला नाही त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रेनने धडक दिल्याने या मुलाचा मृत्यू झाला.
अरबाज (वय 18) असं या तरूणाचं नाव असून तो तेथिल सरकारी शाळेत शिकत होता. क्लासला जाण्यासाठी तो घरातून निघाल्यावर ही घटना घडली आहे. सोमवारी दुपारी वेलकम रेल्वे स्टेशनच्या रूळावर अरबाजचा मृतदेह सापडला. मृतदेहाच्या बाजूला पोलिसांना इअरफोन्स सापडले आहेत. अपघातानंतर अरबाजचा मोबाइल फोन चोरी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. रेल्वे रूळावरून चालत जात असताना अरबाज मध्येच थांबून सेल्फी काढत होता, अशी माहिती जीआरपीने दिली आहे. रेल्वे रूळावरून जात असताना अरबाज मोठ्या आवाजात गाणी ऐकत होता, त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रेनचा आवाज त्याला ऐकु आला नसावा, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास अजून सुरू आहे. तसंच सेल्फी काढण्याच्या मोहातच अरबाजचा जीव गेला आहे का? याबद्दल माहिती देणारा अजून कुठलाही साक्षीदार पोलिसांना मिळाला नाही. या घटनेमागे हत्येची शक्यताही नाकारता येत नाही, असं पोलिसांचं मत आहे.
अपघातानंतर एक तास अरबाजचा मृतदेह रेल्वे रूळावरच पडून होता. वेलकम स्टेशनवरू जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमधील प्रवाशांना मृतदेह दिसल्यावर त्यांनी नियंत्रण कक्षाला याबद्दलची माहिती दिली. शवविच्छेदनानंतर मंगळवारी त्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे देण्यात आला. अपघात स्थळापासून अरबाज फक्त एक किलोमीटर अंतरावर राहत होता. सुत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीस या प्रकरणी अरबाजच्या मित्रांचीही चौकशी करत आहेत. क्लासला जाताना अरबाज त्याच्या काही मित्रांना भेटायचा त्याच मित्रांची चौकशी सुरू आहे. दररोज क्लासला जाताना अपघात झालेल्या मार्गावरूनच तो जायचा का ? या अनुषंगाने मित्रांची चौकशी केली जातीये.