- चंद्रशेखर बर्वेपानिपत : पानिपतच्या युद्धात वीरगतीला प्राप्त मराठा योद्ध्यांच्या स्मारकासाठी लागणारी १० एकर जमीन आता महाराष्ट्र सरकारकडून अधिग्रहित केली जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत येथे केली.
शौर्य स्मारक ट्रस्टच्या वतीने पानिपत येथे २६४ व्या शौर्य दिवस समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुष मंत्री प्रतापराव जाधव, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, हरयाणाचे कृषिमंत्री श्याम सिंह राणा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ट्रस्टचे प्रदीप पाटील उपस्थित होते. फडणवीस यांनी सुरुवातीला ‘काला आम’ या ठिकाणच्या शौर्य स्थळाला भेट देऊन श्रद्धा सुमने अर्पित केली.
मुख्यमंत्री म्हणाले, पानिपतच्या पवित्र भूमीवर मराठ्यांच्या स्मारकासाठी लागणारी १० एकर जागा आता महाराष्ट्र सरकारकडून अधिग्रहित केली जाईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा उभारला जाईल.
काला आम म्हणजे काय..?पानिपतच्या युद्धात सव्वा लाख मराठे हुतात्मे झाले. त्यांच्या रक्ताने येथील आंब्याचे झाड लाल झाले. सुकल्यामुळे रक्त काळे झाले. या झाडाला आंबेसुद्धा काळे येत होते. म्हणून या झाडाला ‘काला आम’ म्हटले जाते. याच झाडाच्या ठिकाणी ‘शौर्य स्मारक’ बांधण्यात आले.
उत्तर भारतातील राज्यकर्ते मराठ्यांशी एक झाले असते तर अहमद शाह अब्दाली आणि अन्य शत्रूची भारताकडे बघण्याचीसुद्धा हिंमत झाली नसती. म्हणून आपल्याला ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ ही गोष्ट कायम लक्षात ठेवण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री