बलवंत तक्षक, चंदीगड पंजाबमध्ये निवडून आलेल्यांची होळी जोरदार रंगणार आहे; मात्र पराभूतांच्या चेहऱ्यांचा रंग उडाला आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये दु:खाची छाया पसरली आहे. बादल सरकारमधील १८ पैकी १० मंत्र्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचेही अनेक दिग्गज निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरले. कार्यकर्ते होळीचा रंग खेळायचा की आपल्या नेत्याला भेटून पराभवाबद्दल दु:ख व्यक्त करायचे या संभ्रमात पडले आहेत.अकाली-भाजपा युतीचे सरकार कोसळल्यामुळे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना दु:ख होणे स्वाभाविक आहे. त्यांचे जावई प्रतापसिंग कैरो यांचा पराभव मात्र जिव्हारी लागला असून होळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. डॉ. दलजीतसिंग चिमा, सोहनसिंग ठंडल, गुलजारसिंग रणिके, सिंकदरसिंग मलुका, जनमेजासिंग सेखो, तोतासिंग आणि सूरजितसिंग रखडा या मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला. भाजपचे मदनमोहन मित्तल, चुन्नीलाल भगत निवडणूक रिंगणात नव्हते. मंत्री सूरजितसिंग ज्यानी आणि अनिल जोशी हे मात्र जिंकू शकले नाहीत. प्रदेशाध्यक्ष विजय संपला यांच्या शिफारशींवरून ज्या तिघांना तिकिटे देण्यात आली, त्यांना दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे सांपला यांच्या चेहऱ्यावरील हास्य हरपले आहे. सिर्साच्या डेरा सच्चा सौदाने समर्थन जाहीर केले असतानाही अकाली-भाजपच्या उमेदवारांना विजय मिळविता आला नाही.कही खुशी, कही गम....काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल, खासदार रवनीतसिंग बिट्टू, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील जाखड यांचा पराभव धक्कादायक मानला जातो. काँग्रेसच्या गोटात विजयाचा जल्लोष असताना या तिघांच्या समर्थकांना होळीचा आनंद लुटता येणार नाही. माजी मुख्यमंत्री स्व. हरचरणसिंग बराड यांच्या कुटुंबातील सदस्य करण कौर बराड यांनाही पराभव स्वीकारावा लागला. आम आदमी पार्टीने प्रथमच पंजाबमध्ये पाय रोवले असले तरी या पक्षाचे संयोजक गुरप्रीत घुग्गी आणि खासदार भगवंत मान, काँग्रेसचे सतविंदर बिट्टी यांच्या पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे.
पंजाबच्या बादल सरकारच्या दहा मंत्र्यांची होळी बेरंग झाली
By admin | Published: March 13, 2017 1:01 AM