नवी दिल्ली – कोरोना व्हायरस महामारीमुळं संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. मेडिकल ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्यानं केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाचे वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता केंद्राने ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन परदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने गुरुवारी याची महिती दिली. सरकारनं सांगितलं की, कोविड १९ च्या दिवसेंदिवस वाढत्या रुग्णांमुळे देशात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यासाठी परदेशातून ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन मागवण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयातच्या माध्यमातून केंद्र सरकार ही प्रक्रिया पार पाडणार आहे. या ऑक्सिजनच्या क्षमतेने १२ राज्यांच्या गरजा भागवल्या जाऊ शकतात. आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे.
या गरज असणाऱ्या १२ राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान यांचा समावेश आहे. विशेषत:महाराष्ट्रासह अनेक राज्यं आहेत ज्याठिकाणी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा अभाव असल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश केले की, ऑक्सिजनचा योग्य आणि सावधानकारक वापर करावा. कुठेही ऑक्सिजन वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. देशात दररोज ७ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता आहे. आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत स्टील संयंत्रात वापरले जाणाऱ्या अतिरिक्त ऑक्सिजनचा वापरही केला जाऊ शकतो.
हवाई दलामार्फत ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करा
देशातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी रस्त्याच्या मार्गाने ११०० ते १३०० कि. मी. चे अंतर पार करावे लागत आहे. यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा वायुसेनेच्या हवाई दलामार्फत करावा, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह यांना पत्राव्दारे केली आहे.