लोकमत न्यूज नेटवर्कअलवर (राजस्थान) : स्वत:च्या गायी ट्रकमधून घेऊन जाणार्या उमर मोहम्मद खान या ३५ वर्षाच्या दुग्धव्यावसायिकास गोरक्षकांच्या जमावाने वाटेत अडवून गोळ्य़ा घालून त्याची हत्या केल्याच्या आरोपावरून राजस्थानच्या अलवरमध्ये काहीसे तणावाचे वातावरण आहे. मृताच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या सामाजातील लोकांनी कथित गोरक्षकांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी अलवर जिल्हा रुग्णालयाबाहेर धरणे धरले असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.मृत उमर खान मेओ मुस्लिम समाजातील होता. राजस्थान, हरियाणा व उत्तर प्रदेशाच्या काही भागास मिळून मेवात म्हणून ओळखल्या जाणार्या भागात या समाजाची बरीच वस्ती आहे.इस्पितळाबाहेर धरणे धरून बसलेल्या या समाजातील लोकांचा असा आरोप आहे की, उमर खान व ताहीर खान आणि जब्बा या दोघांसह ट्रकमधून गायी घेऊन भरतपूरकडे निघाला असता वाटेत जनावाने त्यांचा ट्रक अडवून गोळीबार केला. त्यात उमर खान ठार झाला. ताहीर खान हाही गोळी लागून जखमी झाला. पण त्याने तेथून पळ काढला व तो हरियाणातील एका गावात खासगी इस्पितळात दाखळ झाला.उमर खानचा मृत्यू रेल्वेखाली चिरडून झाला असे वाटावे यासाठी जमावाने त्याचा मृतदेह रेल्वेरुळांवर नेऊन टाकला व त्यानंतर त्याच्यावरून गाडी गेली, असाही उमर खानच्या कुटुंबियांचा आरोप आहे.पोलिसांनी रेल्वेमार्गावर मिळालेला मृतदेह इस्पितळात आणला. त्यांनी या संदर्भात रविवार संध्याकाळपर्यंत औपचारिक गुन्हा नोंदविला होता. अलवरचे (दक्षिण) सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल बेनिवाल यांच्या म्हणण्यानुसार या दोन पूर्णपणे वेगळ्य़ा घटना आहेत व त्यांचा विनाकारण एकमेकरांशी संबंध लावला जात आहे. मृतदेह रामगढ येथे रेल्वेमार्गावर मिळाला. तेथून सुमारे १५ किमी अंतरावर गोविंगढ येथे अर्धवट जळलेल्या अवस्थेत एक पिक अप ट्रक मिळाला. त्यात चार जिवंत व एक मेलेली गाय होती.याच अलवर जिल्ह्यात गेल्या एप्रिलमध्ये हरियाणातील पेहलू खान या गुरे व्यापार्याची कथित गोरक्षकांनी मारहाण करून हत्या केली होती. आताची घटना ही त्याचीच पुनरावृत्ती आहे, असे धरणे धरून बसलेल्या लोकांचे म्हणणे असून ते या हल्ल्यामागे राकेश नावाची व्यक्ती असल्याचे सांगत आहेत.
गुन्हा नोंदवा, अन्यथा मृतदेह घेणार नाहीरेल्वेरुळांत सापडलेल्या मृतदेहावरून गाडी गेल्याने तो एवढा छिन्नविच्छिन्न झाला आहे की त्याची ओळख पटणेही कठीण आहे. जयपूरला नेऊन शवविच्छेदन केल्यानंतरच ओळख पटू शकेल व त्याच्या शरीरावार गोळ्यांच्या जखमा आहेत की नाहीत, हेही स्पष्ट होईल.-अनिल बेनिवाल, सहा. पोलीस अधीक्षक, अलवर
ही हत्या विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी केली आहे. गुन्हा नोंदवून त्यांना अटक केल्याखेरीज आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही व धरणेही सोडणार नाही. -जमशीद खान, मेओ मुस्लिमांचे नेते