चंडीगढ - हरयाणाचेमुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना ग्रामीण भागातील जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या घोषणेनंतर गावकऱ्यांनी ते उतरलेल्या घरालाच घेराव घातला. यावेळी, अनेकांनी ग्रामस्थांना समाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी आपल्या रोष व्यक्त करत सर्वांनाच परतवून लागले. त्यामुळे, संबंधित परसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते, पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी जमा झाला होता. महेंद्रगड येथील एका जनसंवाद कार्यक्रमानंतर ही घटना घडली.
महेंद्रगड गावच्या सीमारेषेवर शुक्रवारी जनसंवाद मोहिमेचा सांगता कार्यक्रम होता. यावेळी, तेथे उपस्थित ग्रामस्थांनी गावाला उप-तहसिलचा दर्जा देण्याची मागणी केली. त्यामुळे, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेत, या गावाला उप-तहसिलचा दर्जा देण्याची घोषणाच केली. कार्यक्रमानंतर जवळील गाव दोंगडा येथे मुक्कामी होते. येथील ग्रामस्थांना आशा होती की, राज्याचे मुख्यमंत्री गावात आले आहेत, मग काहीतरी चांगलं पदरात पडेल. मात्र, गावच्या काही लोकांनी मागणी केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गावाला उप-तहसिलचा दर्जा देण्याची घोषणा केल्याचं गावकऱ्यांना कळताच त्यांचा संताप अनावर झाला.
गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा बहिष्कार केला, याउलट मुख्यमंत्री जेथे उतरले आहेत, त्या घराला घेराव घालून आपला विरोध दर्शवला. यावेळी, अटेलीचे स्थानिक आमदार सीताराम आणि माजी शिक्षणमंत्र्यांनीही ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांनी आमदारांनाही फटकारले, तसेच त्यांचाही विरोध केला. त्यानंतर, मुख्यमंत्री खट्टर यांनी काही ग्रामस्थांना बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच, मला स्थानिक स्थितीबद्दल माहिती नव्हती. यापुढील अटेली दौऱ्यात योग्य गावाचे सर्वेक्षण करुनच उप-तहसिल बनविण्याचा निर्णय होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री खट्टर यांनी ग्रामस्थांना दिले.
दरम्यान, ग्रामस्थांनी घेराव घातल्यामुळे मुख्यमंत्र्यांना तब्बल ४ तास घरातच बंद राहावे लागले. यावेळी, मोठा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा जवान घटनास्थली पोहोचले होते. तर, सुरक्षेच्या मुद्द्यावरुन मोठे पोलीस अधिकारीही गावात आले होते.