नवी दिल्ली : मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांत काही जणांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी (ईव्हीएम) छेडछाड केल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसने या प्रकरणी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा इशारा भाजपाकडेच आहे. राज्यातील एका खासगी हॉटेलमध्ये सापडलेली इव्हीएम तेथून निवडणूक अधिकारी घेऊन जात आहेत, सागर जिल्ह्यात निवडणूक कामासाठी नोंदणी न केलेल्या एका स्कूलबसमधून ही यंत्रे नेली जात आहेत, अशी यंत्रे एका स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्याची दृश्ये असलेल्या व्हिडीओफिती पुरावा म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगाला शनिवारी सादर केल्या.मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांत काही जणांनी मतदान प्रक्रियेत खूप गैरप्रकार केले आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी यासंदर्भात केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, या दोन राज्यांत पराभव होणार हे दिसू लागल्यानंतर स्ट्राँगरुममध्ये ठेवलेल्या इव्हीएम यंत्रांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. या गैरप्रकारांची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. छत्तीसगढ राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीच्या आधी निवडणूक आयोगाने काही गोष्टी अमलात आणाव्यात. स्ट्राँगरुममधून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मतमोजणीसाठी संबंधित केंद्रांमध्ये नेली जात असताना त्यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना तेथे हजर राहाण्याची परवानगी द्यावी.पात्र मतदारांकडून टपालाद्वारे मतपत्रिका मिळाल्या आहेत की नाही याची नीट तपासणी व्हावी. राजनंदनगाव, कोंडागाव, विलासपूर येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात यावा. मतमोजणीची पहिलीफेरी संपल्यानंतरच दुसºया फेरीला सुरुवात करावी.>भोपाळमधील स्ट्राँगरुममध्ये एक तास वीज गायबकाँग्रेस नेते अभिषेक सिंघवी, मनीष तिवारी, प्रणब झा, पक्षाचे छत्तीसगढचे प्रभारी पी. एल. पुनिया यांच्यासह अन्य नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने निवडणूक आयोगासमोर या तक्रारींचा पाढा वाचला. पुनिया म्हणाले की, मतदानानंतर इव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुमच्या जवळपास लॅपटॉप, मोबाइल हाती घेतलेले लोक आढळून आले होते. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी म्हटले आहे की, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील इव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये एके दिवशी तासभर वीजच नव्हती. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडले होते. इव्हीएम यंत्रे एखाद्या खासगी हॉटेलमध्ये ठेवण्याचे कारणच काय असा सवाल मनीष तिवारी यांनी विचारला आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये ईव्हीएमशी छेडछाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 4:00 AM