पंजाबमध्ये सरकारी अधिकारी आणि सरकारमधील तणाव आता दिवसेंदिवस वाढत आहे. सीएम भगवंत मान यांनी गैरपद्धतीनं सुट्टीवर गेलेल्या अधिकाऱ्यांना लेखी वॉर्निंग दिली आहे. पाच दिवसांच्या रजेवर असलेल्या पीसीएस अधिकाऱ्यांना आणि रजेवर जाण्याच्या तयारीत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी थेट वॉर्निंग दिली की, सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध झीरो टॉलरेन्सचं धोरण आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संपावर असलेल्या पंजाब सिव्हिल सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या इशाऱ्यानंतर पंजाबच्या मुख्य सचिवांनीही एक मेमो जारी केला आहे. सामुहिक रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांना दुपारी २ वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा त्यांना निलंबित करण्यात येईल. पंजाब सिव्हिल सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांना कर्तव्य नियमांनुसार युनियन बनवण्याची आणि संपावर जाण्याची परवानगी नाही, असे या मेमोमध्ये थेट म्हटले आहे.
सरकारवर दबाव आणणं खपवून घेणार नाही- मुख्यमंत्री मानअधिकाऱ्यांनी जर कोणत्याही पद्धतीनं सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर ते अजिबात सहन केलं जाणार नाही. पंजाब सरकारकडून सरकारी अधिकाऱ्यांना अल्टीमेटम जारी करण्यात आलं आहे आणि ११ जानेवारी २०२३ रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आली आहे. नाहीतर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबीत केलं जाईल.
सामूहिक रजेवर पीसीएस अधिकारीएका अधिकाऱ्याविरोधात नोंदवलेल्या गेलेल्या एफआयआर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात पंजाबच्या पीसीएस ऑफिसर्स असोसिएशनने पाच दिवसांच्या सामूहिक सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या विरोधात दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या एफआयआर संदर्भात आयएएस अधिकारी रजेवर जाण्याच्या तयारीत आहे. पुरावे गोळा न करता व नियम धाब्यावर बसवून काही अधिकार्यांवर भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई केली जात असल्याचे अधिकार्यांचे म्हणणे आहे.