नंदकिशोर पुरोहित -
राजकोट : राजकोटमधील एक किस्सा खूपच विचित्र आहे. या कथेचा महत्त्वाचा भाग म्हणजे येथील ‘सोने’. आश्चर्यचकित होऊ नका. आम्ही येथे चमकदार सोन्याबद्दल बोलत नाही. येथे आम्ही राजकोटवासीयांच्या ‘सोन्या’बद्दल अर्थात त्यांच्या प्राणप्रिय झोपेबद्दल बोलत आहोत. राजकोटच्या लोकांना त्यांची झोप इतकी प्रिय आहे की त्यात ते व्यवसायाचाही अडथळा येऊ देत नाहीत.
दुपारी १ ते ४ या वेळेत जवळपास सर्व शहर झोपी जाते. कोणताही पर्यटक इथल्या रस्त्यावर सहज फिरू शकतो, कारण येथे फक्त औषधी आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये किंवा नोकरांची फौज तैनात असते, अशीच दुकाने चालू असतात. उर्वरित दुकाने बंद करून व्यापारी घरी जाऊन जेवणावर ताव मारून झोपणे पसंत करतात.
सवय का लागली?मयूर सोनी नावाच्या तीन पिढीतील व्यावसायिकाने यामागचे रहस्य उघड केले. त्याच्या म्हणण्यानुसार, गोंडल, धोराजी आणि इतर किनारपट्टी भागातील लोक प्राचीन काळापासून राजकोटमध्ये रोजच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येतात. जुन्या काळी वाहतुकीची साधने नव्हती. अशा परिस्थितीत खरेदीसाठी आलेले लोक सकाळीच येथे पोहोचत, खरेदी करत आणि मग जेवण करून ग्रामीण परिसराच्या सवयीनुसार विश्रांती घेत. या ग्राहकांच्या आरामाची व्यवस्था दुकानांमध्येच करण्यात आली होती. तेव्हापासूनच ग्राहकांची ही सवय इथल्या लोकांनाही लागली.
कार्यकर्त्यांची कसरतलोकांची ही सवय सर्वच पक्षांना त्रासदायक ठरते. रणनीती आखली तरी दुपारच्या झोपेतून लोकांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांना कसरत करावी लागते.कोणाची झोप उडणार?मतदारांची ही सवय नेमक्या कोणत्या पक्षाची झाेप उडवते हे येत्या ८ तारखेला सर्वांसमोर येणार आहे. येथे काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्ष जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.