- सुनील चावकेनवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षामुळे २८ विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या ‘आप’चा जागावाटपावरुन विविध राज्यांमध्ये काँग्रेसशीच संघर्ष आहे. भाजप आणि काँग्रेसपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष असलेल्या ‘आप’ची देशभरात किमान ५० ते ७० जागा लढविण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासाठी ‘आप’ला काँग्रेसशीच भिडावे लागणार आहे.
काँग्रेस आणि ‘आप’मध्ये प्रामुख्याने दिल्ली, पंजाब, गुजरात, हरयाणा, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांमध्ये जागावाटपावरून संघर्ष निर्माण होणार असल्याचे संकेत ‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर ‘आप’चे प्रतिनिधी खासदार राघव चढ्ढा यांनी दिले. ‘इंडिया’ आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आल्यामुळे चालू वर्षाअखेर होऊ घातलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी ही आघाडी झालेली नाही. भाजप-रालोआला टक्कर देणाऱ्या प्रमुख पक्षाचे आघाडीकडून तत्त्वतः समर्थन अपेक्षित असेल. पण, त्याची पर्वा न करता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपविरुद्ध लढणाऱ्या काँग्रेसला साथ देण्याऐवजी ‘आप’ने निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. या राज्यांत ‘आप’ला यश मिळाल्यास तिथेही ‘आप’ लोकसभेच्या जागांवर दावा करेल, असे रागरंग आहेत.