कोलकाता : लग्नाचे वऱ्हाड मुंबईहून गुवाहाटीला निघाले. पण, रेल्वे झाली लेट. आता लग्नाची घटिका हुकते की काय, या भीतीने चिंताक्रांत झालेल्या वराच्या मदतीला रेल्वे विभाग धावून आला. कधी नव्हे, असे पाऊल रेल्वेने उचलले.
हावडा येथून गुवाहाटीला जाणारी एक्स्प्रेस रेल्वे अधिकाऱ्यांनी काही मिनिटे थांबवून ठेवली. मुंबईतून निघालेली गाडी हावडा येथे पोहोचताच रेल्वेने संपूर्ण वरातीला दुसऱ्या गाडीत बसविण्यासाठी मदत केली आणि अखेर वऱ्हाड गुवाहाटीकडे रवाना झाले.
आसाममध्ये होणाऱ्या लग्नासाठी मुंबईतून नवरदेवासह ३४ जणांचे वऱ्हाड मुंबईतून गीतांजली एक्स्प्रेसने कोलकात्याला निघाले. तेथून गुवाहाटीला जाण्यासाठी सरायघाट एक्स्प्रेसमध्ये त्यांचे आरक्षण होते. हावडा येथे दुपारी १:०० वाजता पोहोचणारी गीतांजली एक्स्प्रेस काही तास लेट झाली.
दोन्ही गाड्यांच्या वेळांमध्ये तीन तासांचे अंतर होते. तरीही गाडी लेट झाल्यामुळे वरातींपैकी एक चंद्रशेखर वाघ यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आणि रेल्वेला मदत मागितली. या पोस्टनंतर रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांनी हावडा येथे डीआरएम यांना आवश्यक पावले उचलण्यासाठी सूचना केली. त्यानंतर रेल्वेने चक्क सरायघाट एक्स्प्रेस काही मिनिटे थांबवून ठेवली. ही गाडी दुपारी चार वाजता हावडा येथून रवाना होते. मात्र, गीतांजली एक्स्प्रेस चार वाजून ८ मिनिटांनी हावडा येथे पोहोचली.
गीतांजली एक्स्प्रेस हावडा येथे पोहोचल्यानंतर संपूर्ण वरातींना नव्या स्थानकातून जुन्या स्थानकावर नेले आणि सरायघाट एक्स्प्रेसमध्ये बसविले. त्यानंतरच गाडी रवाना झाली आणि वाघ कुटुंबीय व नवरदेवाला हायसे वाटले.
वरातीला नेण्यासाठी सज्ज होत्या गाड्या
- हावडा रेल्वे स्थानकावर वाघ यांच्या डब्याजवळ रेल्वेने बॅटरीवर धावणाऱ्या गाड्या सज्ज ठेवल्या होत्या. वरातीच्या सामानासह सर्वांना अतिशय तत्परतेने सरायघाट एक्स्प्रेस उभी असलेल्या प्लॅटफॉर्मवर नेले. यासाठी दोन्ही ट्रेनच्या प्रवाशांनी सहकार्य केले. नवरदेव त्याच्या लग्नासाठी पोहोचेल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.