जगातील 60 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट पोहोचला आहे. कोरोना ओमायक्रॉनने (Corona Omicron Cases) भारताचे टेन्शन वाढविले आहे. आधीच रुग्ण वाढत असताना देशावर आता कम्युनिटी स्प्रेडची टांगती तलवार लटकू लागली आहे. डब्ल्यूएचओने ओमायक्रॉन डेल्टापेक्षाही वेगाने पसरणार असल्याने हॉस्पिटलनी तयार रहावे असा इशारा नुकताच दिला आहे.
भारतात परदेश प्रवास न केलेल्यांना किंवा काहीही संबंध नसणाऱ्यांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. द इंडियन सार्स-CoV2 जिनोमिक कंसोर्टियम (Insacog) या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. या रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा कशी झाली याचा शोध घेतला जात आहे. इन्साकॉगला कम्युनिटी स्प्रेडला तर सुरुवात झाली नाहीय ना याची भीती वाटू लागली आहे. कोणताही प्रवास केलेला नसताना काही जण ओमायक्रॉनने बाधित सापडले आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काही रुग्ण कोणत्याही ट्रॅवल हिस्ट्रीविना ओमायक्रॉनने बाधित झाले आहेत. त्यांच्या परिसरावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. आरोग्य मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच देशातील काही क्लस्टरमध्ये ओमायक्रॉन संक्रमण झाल्याचे समोर आले आहे, असे म्हटले होते. सतत लक्ष ठेवणे आणि तपासणीतून हे संक्रमण रोखले जाऊ शकते, असे मंत्रालयाने म्हटले होते.
Insacog ची ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागण्याच्या आधी एक दिवस शुक्रवारी बैठक झाली होती. यावेळी त्यांनी रुग्णांच्या जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देण्यास सांगितले होते. देशात आतापर्यंत 77 ओमायक्रॉन बाधित रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.