श्रीनगर : काश्मीरचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीने सर्वपक्षीय शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये आलेले असताना रविवारीही हिंसक जमावला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई केल्यामुळे खोऱ्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरक्षा दलाने काल केलेल्या कारवाईमध्ये २00 हून अधिक जण जखमी झाले असून, त्यामुळे संपूर्ण खोऱ्यात पुन्हा एकवार तणाव निर्माण झाला आहे.श्रीनगर शहराच्या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी असून, त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आधीपासूनच संचारबंदी होती. कालच्या घटनेनंतर बटामालू आणि मैसुमा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही संचारबंदी लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सध्या परिस्थिती शांत असली तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)सर्व व्यवसाय बंदशहराच्या सर्व संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस ठेवले आहेत. सलग ५९ व्या दिवशीही खोऱ्यातील आणि श्रीनगरमधील लोकांवर निर्बध कायम आहेत. सर्व दुकाने, कार्यालये, पेट्रोल पंप आणि अन्य लहान-मोठे व्यवसाय बंद असून, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारी कार्यालये आणि सर्व बँका काही प्रमाणात सुरू झाल्या असून, तेथील उपस्थितीमध्येही वाढ झाल्याचा दावा पोलिसांतर्फे करण्यात आला. रस्त्यांवरील वाहतूक मात्र पूर्णपणे बंद आहे.
काश्मीरमध्ये तणाव, संचारबंदी कायम
By admin | Published: September 06, 2016 4:08 AM