नवी दिल्ली - India Alliance Seat Sharing ( Marathi News ) विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया'च्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून वाद आणि तणाव वाढला आहे. त्यात काँग्रेसला सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आघाडीतील सर्वात मोठा आणि राष्ट्रीय पक्ष असल्याने सर्व पक्षांना सांभाळण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यात प्रादेशिक आणि सहकारी पक्ष आपापल्या राज्यात काँग्रेसशी जुळवून घेण्यासाठी दबाव आणत आहेत. पश्चिम बंगाल असो वा दिल्ली आणि पंजाब, बिहार असो वा यूपी. जागावाटपावरून मंथन होत असताना सर्वत्र वादाच्या बातम्या येत आहेत. त्यामुळेच मुदत संपून आठवडा उलटूनही एकमत होऊ शकले नाही. आता दिल्ली हायकमांड जागा निश्चित करणार आहे.
इंडिया आघाडीत २८ पक्ष मित्रपक्ष आहेत. आघाडीतील विरोधी पक्षांची दिल्लीत १९ डिसेंबर रोजी चौथी बैठक झाली. यामध्ये सर्व पक्षांनी आपापल्या राज्यात जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करून त्यावर एकमत करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर होती. मात्र कोणताही पक्ष तडजोड करण्यास किंवा मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या राज्यात जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. मात्र, हे शक्य नाही. अशा स्थितीत आघाडीतील पक्षांमध्ये राज्यस्तरावर वाद सुरू झाला आहे.
जागावाटपात काँग्रेससमोर सर्वात मोठी अडचण आणि आव्हान आहे. उत्तर ते दक्षिणेपर्यंत जागावाटपावर विचारमंथन आणि एकमत निर्माण करण्यात ते आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. गुरुवारी, काँग्रेस नेतृत्वाने राज्य पदाधिकाऱ्यांना सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष २५५ जागांवर लक्ष केंद्रित करेल. म्हणजेच पक्षाने या जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या जिंकण्यायोग्य मानतात. मात्र, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. काँग्रेसने या जागा जिंकण्याच्या शक्यतेच्या यादीत ठेवल्या आहेत.
काँग्रेस लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. त्यांनी राज्यांना ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यास सांगितले आहे. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून पक्ष या आठवड्यात प्रत्येक राज्यासाठी स्क्रीनिंग समित्या देखील तयार करेल. त्याचसोबत तातडीनं इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांसोबत जागा वाटपावर चर्चा सुरू करेल. काँग्रेसच्या पाच सदस्यीय राष्ट्रीय आघाडी समितीला सर्वसहमतीची जबाबदारी देण्यात आली आहे. ती चर्चा करून सूत्र निश्चित करेल.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ४२१ जागा लढवल्या आणि ५२ जागा जिंकल्या. काही राज्यांमध्ये काँग्रेसनं आघाडी केली होती. त्यात बिहारमध्ये RJD, महाराष्ट्रात NCP, कर्नाटकात JD(S), झारखंडमध्ये JMM आणि तामिळनाडूमध्ये DMK सोबत काँग्रेस रिंगणात होती. बिहारमध्ये ४० पैकी फक्त ९ जागा, झारखंडमध्ये १४ पैकी ७ जागा, कर्नाटकात २८ पैकी २१, महाराष्ट्रात ४८ पैकी २५ आणि तामिळनाडूत ३९ जागांपैकी ९ जागा काँग्रेसनं लढवल्या. उत्तर प्रदेशात काँग्रेसने ८० पैकी ७० जागा लढवल्या होत्या.