लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेला लष्करी तणाव ‘परस्परांच्या आणि समान सुरक्षेवर’ आधारीत चर्चेतून सलोख्याने दूर होईल अशी आशा लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी मंगळवारी व्यक्त केली. नरवणे म्हणाले, चीन आणि पाकिस्तान यांच्या संगनमताने भारताला निर्माण झालेला धोका हा केवळ सदिच्छेने दूर होऊ शकत नाही.
जनरल नरवणे १५ जानेवारी या लष्कर दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणताही प्रसंग निर्माण झाल्यास त्याला हाताळण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे, असे जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वाढत चाललेल्या सुरक्षा आव्हानांबद्दल बोलताना नरवणे यांनी उत्तरेकडील सीमांवर लष्करी तुकड्यांची फेररचना करण्याची गरज असल्याची जाणीव झाली आणि त्यामुळे चीनला लागून असलेल्या सीमांवर पुरेसा भर म्हणून पावले उचलण्यात आली आहेत, असे सांगितले. संवाद आणि चर्चा या माध्यमांतून आम्ही सलोख्याने प्रश्न सोडवू अशी मला खात्री आहे. सकारात्मक परिस्थितीची मला खूपच खात्री आहे. परंतु, कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास आम्ही तयार आहोत, असे ते म्हणाले. भारतीय सैन्य फक्त लडाखमध्येच नाही तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अत्यंत उच्च दर्जाची सावधगिरी राखून आहे, असे नरवणे म्हणाले.