- धनाजी कांबळेहैदराबाद : तेलंगणात मुदतीआधीच सरकार बरखास्त करून एकहाती सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. तीन महिने आधीच प्रचाराची संधी मिळाल्याने केसीआर यांच्या टीआरएसच्या उमेदवारांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच घरोघरी गाठीभेटी सुरू केल्या होत्या. त्यामुळेच विरोधकांनी आश्चर्यकारकरित्या एकजूट बांधून केलेल्या आघाडीचा म्हणावा तसा परिणाम झाल्याचे सध्याच्या एक्झिट पोलवरून तरी दिसत नाही. मुदतपूर्व सरकार बरखास्त करण्याचा निर्णय केसीआर यांच्या पथ्थ्यावरच पडेल, अशीस्थिती आहे.तेलंगणात ११९ जागांसाठी निवडणूक झाली. यापैकी १०५ उमेदवारांची घोषणा केसीआर यांनी ६ सप्टेंबर रोजी सरकार बरखास्त केल्यानंतर काही मिनिटांतच केली होती. त्यामागे पुरेसा वेळ मिळावा, हीच रणनिती असावी, असे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. काँग्रेस, टीडीपी, टीजेएस आणि सीपीआय आघाडीने देखील मिळालेल्या कालावधीत चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र, टीडीपीबद्दल जे आकर्षण आणि लोकप्रियता आंध्र प्रदेश राज्य एकत्रित असताना होती. ती आता दिसली नाही. त्याउलट काही मतदारसंघात केवळ एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर प्रेम करणारे मतदारच अधिक दिसले. विशेषत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत प्रचारसभांमध्ये चंद्राबाबू ज्या ज्या मतदारसंघात गेले. त्या ठिकाणी काही प्रमाणात हलचल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसने देखील २०१४ मध्ये २१ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचीही ताकद दुर्लक्षित करता येत नाही.२०१४ मध्ये केसीआर यांच्या टीआरएसला ३४.३ टक्के मतदान झाले होते. तर काँग्रेस २१, टीडीपी १५, एमआयएम ३.८, तर भाजपला ७.१ टक्के मतदान झाले होते. आता मात्र पक्षनिहाय मिळालेली मतांची टक्केवारी अनेकांची गणिते घडविणारी किंवा बिघडवणारी ठरणार आहे. प्रत्यक्षात मतदारांनी कोणाला किती मतांचे दान दिले आहे, हे ११ डिसेंबरलाच समजणार आहे. के. चंद्रशेखर राव गजवेल मतदारसंघातून रिंगणात होते. आताही याच मतदारसंघातून ते रिंगणात आहेत. गेल्या वेळी त्यांना ८६, ६९४ मते मिळाली होती. त्यांनी टीडीपीच्या प्रताप रेड्डी यांचा १९,३९१ मतांनी पराभव केला होता. या वेळी मात्र काँग्रेस आघाडीत टीडीपी सहभागी आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरलेल्या रेड्डी यांनीही त्यांना चांगली टक्कर दिली असण्याची शक्यता आहे. ते येत्या मंगळवारी स्पष्ट होईलच.रंगतदार लढतीकाही मतदारसंघात निवडणूक अतिशय रंगतदार झाली आहे. मात्र, गेल्या वेळी २०१४ मधील काही निवडक मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांच्या मतांची टक्केवारी बघितल्यास या वेळी कोणत्या पक्षाला तिथे संधीमिळू शकते, हे स्पष्ट होते.टीआरएसचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, त्यांचे पुत्र के.टी. रामाराव, भाचे टी. हरीश राव तसेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, भाजपचे टी. राजा सिंह यांच्या मतदारसंघातील निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.