नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांत कर्नाटकातील जागावाटपाबाबत जनता दल (एस) या पक्षाशी सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये काँग्रेसला अनेक अडथळे येत आहेत. या अनुभवापासून सावध झालेल्या काँग्रेसने विरोधी पक्षांची राष्ट्रीय आघाडी स्थापन करण्यामध्ये कोणतीही विघ्ने येऊ नयेत म्हणून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांची प्राधान्याने मदत घ्यायचे ठरविले आहे.आघाडीसाठी विविध नेत्यांशी चर्चा करण्याकरिता नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, नायडू, पवार, फारुक अब्दुल्ला या तिघांची या महिन्याच्या मध्याला एक बैठक होणार आहे. त्यामध्ये आघाडी स्थापन करण्याकरिता करावयाच्या ठोस प्रयत्नांबाबत चर्चा होईल.तेलगू देसम पक्षाचे प्रवक्ते कम्बामपती राममोहन राव यांनी सांगितले की, योग्य वाटतील तितक्या जागा मागण्याचा प्रादेशिक पक्षांना अधिकार आहेच.लोकसभा निवडणुकांसाठी आघाडी स्थापन करताना जागावाटपाचा प्रश्नही चर्चेच्या माध्यमातून सोडविला जाईल. संसदेचे सध्या सुरू असलेले अधिवेशन ८ जानेवारीला संपत असून, त्यानंतर दोन्ही पक्षांच्या होणाऱ्या बैठकीत कर्नाटकमधील लोकसभा जागावाटपाचा तिढा सुटेल, अशी आशाही माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी व्यक्त केली आहे.हव्या आहेत १२ जागाकर्नाटकामध्ये आघाडी सरकार स्थापन करण्याआधी काँग्रेस व जनता दल (एस)मध्ये सर्व पदे २:१ या प्रमाणात वाटून घेण्याचे ठरले होते. या सूत्रानुसार लोकसभा निवडणुकीतील जागावाटपात राज्यातील २८ जागांपैकी जनता दल (एस)च्या वाट्याला १० व काँग्रेसला १८ जागा येणार आहेत.मात्र, जनता दल (एस)चे प्रमुख एच. डी. देवेगौडा आता १२ जागा मिळाव्यात म्हणून हटून बसले आहेत. ते म्हणाले की, जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर काँग्रेसशी मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी आम्ही करीत आहोत.
कर्नाटकात तिढा; आघाडीसाठी काँग्रेस पवार, चंद्राबाबूूंवर विसंबून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 5:58 AM