भोपाळ :मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाद झाल्याने चुलत भावानेच धावत्या कारमधून तरुणाला ढकललं आणि तो तरुण सीट बेल्टमध्ये अडकल्यानंतर २५ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. भोपाळ हायवेवरील या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. संदीप नकवाल (वय ३५ वर्ष) असं मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी नराधम आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील सिक्योरिटी लाइनमधील रहिवासी असलेला संदीप नकवाल हा आपल्या एका नातेवाईकाच्या निधनानंतर तेराव्याच्या विधीसाठी नसिराबाद इथं गेला होता. तिथं संदीपचा चुलत भाऊ संजीव नकवाल हादेखील आला होता. विधी आटोपल्यानंतर संदीप आणि संजीव हे मित्र राजेश चढार याच्या कारमधून घरी परतण्यासाठी निघाले. मात्र वाटेत दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर संजीवने धावत्या कारमधूनच संदीपला बाहेर ढकललं. त्यानंतर संदीप कारच्या सीट बेल्टला अडकला गेला. मात्र त्यानंतरही राजेश आणि संजीव कार न थांबवता सुसाट निघाले. तब्बल २५ किलोमीटर अंतरापर्यंत त्यांनी संदीपला फरफटत नेलं.
हे भयंकर दृष्य पाहिल्यानंतर हायवेवरील एका वाटसरूने पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करत कार थांबवली आणि आरोपी संजीव आणि राजेश चढार यांना ताब्यात घेतलं. तसंच त्यांच्याविरोधात भा.दं.वि.च्या ३०२ कलमांतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.