उत्तरकाशी - उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील पुरोला क्षेत्रात रविवारी भीषण दुर्घटना झाली. बस दरीत कोसळल्याने बसमधील 25 पर्यटक प्रवाशांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी आहेत. बसमधील सर्वच प्रवाशी मध्य प्रदेशचे रहिवाशी होते, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य सुरु केले होते.
उत्तरकाशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापक देवेंद्र पटवाल यांनी सांगितले की, ऋषिकेश-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 94 वर डामटापासून 2 किमी अंतरावर रिखावू खड्ड येथे रविवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. या बसमधील भाविक यमुनोत्री धाम येथे दर्शनांसाठी जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापक विभागाने घटनास्थळी धाव घेतली. बचाव आणि मदतकार्य जोमाने सुरु केले. मात्र, बस खोल दरीत कोसळल्याने 25 प्रवाशांचा या दुर्घटनेत जीव गेला.
दरम्यान, उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी अभिषेक रुहेला यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर, उत्तराखंडच्या राज्यपालांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मृत व्यक्तींबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींवर तात्काळ उपचार आणि घटनास्थळी सर्वोतपरी मदतकार्य करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तसेच, मृतांच्या वारसांना 1 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर, जखमींना तात्काळ 50 हजार रुपये आणि मोफत उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.