राजस्थानमधील चुरू येथील नाथों की ढाणीजवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघातामध्ये मेघसर येथील सरकारी शाळेतील ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या मुलांपैकी ३ मुलांची प्रकृती गंभीर आहे. अपघात झाला तेव्हा हे विद्यार्थी शिक्षक भागूराम मेघवाल यांच्या रिटायरमेंट पार्टीमध्ये जात होते. अपघातानंतर जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर ४ मुलांना हायर सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात ५० वर्षीय शिक्षक अशोक मीणा आणि एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हे सर्व विद्यार्थी एका वाहनात बसून पार्टीला जात होते. त्याचवेळी नाथों की ढाणी जवळ हे वाहन उलटले आणि सर्व मुलं जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. तसेत तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. सर्व जखमींना प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामध्ये चार मुलांना अधिक गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार वाहनाच्या चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.