उज्जैन : उज्जैनपासून ४० किमी अंतरावर असलेल्या बडनगरमध्ये सोमवारी हृदयद्रावक घटना घडली. येथे डायव्हर्जन रोडवर राहणारे ६८ वर्षीय दयाराम बडोदे हे घरी चार्जिंगला लावलेल्या मोबाइलवर मित्राशी बोलत होते. दरम्यान, मोबाइलचा स्फोट झाला. त्यात वृद्धाच्या डोक्यापासून छातीपर्यंतच्या भागाचे अक्षरश: तुकडे झाले.
घटनास्थळावरून एका मोबाइल कंपनीचा एकच फोन खराब झालेला आढळला. पोलिसांनी मोबाइलचे तुकडे जप्त करून तपासासाठी पाठवले आहेत. चार्जिंगच्या अवस्थेत ते मोबाइलवर बोलत होते.
दयाराम सोमवारी त्यांचे मित्र दिनेश चावडासोबत एका कार्यक्रमासाठी इंदूरला जाणार होते. दिनेश यांनी रेल्वेस्थानक गाठले. वेळ दयाराम स्थानकावर पोहोचले नाही. त्यामुळे दिनेश यांनी कॉल केला; परंतु रिंग जाताच ती बंद पडली. त्यानंतर सारखा मोबाइल बंद येत होता. त्यामुळे दिनेश यांनी दयाराम यांचे घर गाठले असता त्यांना भीषण दृश्य पाहायला मिळाले. दयाराम रक्ताच्या थारोळ्यात होते. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक मनीष मिश्रा घटनास्थळी पोहोचले. वृद्धाचा मानेपासून छातीपर्यंतचा भाग आणि एक हात छिन्नविछिन्न झाला होता. मोबाइल स्फोटामुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.