नवी दिल्ली: पाकिस्तानशी चर्चा करायला भारताने कधीही नकार दिलेले नाही. मात्र, सीमेवरील गोळीबारात भारतीय जवान शहीद होत असताना पाकिस्तानशी चर्चा करणे सयुक्तिक ठरणार नाही, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. त्या शुक्रवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांनंतर नव्या सत्ताधाऱ्यांशी भारत चर्चा करणार का, असा प्रश्न सुषमांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सुषमा यांनी म्हटले की, आम्ही पाकिस्तानशी निवडणुकीपूर्वीही ठोस चर्चा करायला तयार आहोत. आम्ही कधीच चर्चेला तयार नाही, असा पवित्रा घेतला नव्हता. आम्ही फक्त इशारा दिला होता. परंतु दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी सुरु ठेवता येणार नाही. आमच्या सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले होत असतानाचा काळ चर्चेसाठी योग्य नाही, असे स्वराज यांनी म्हटले. येत्या गुरुवारी पाकिस्तानची संसद बरखास्त होणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजी पाकिस्तानात निवडणुका होत आहेत. या काळात पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी नासिर उल मुल्क यांच्याकडे देण्यात आलेली आहे. ते पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश होते आता पंतप्रधानपदाची त्यांच्याकडे अंतरिम जबाबदारी असेल.मुल्क यांनी यापुर्वी पाकिस्तानच्या निर्वाचन आयोगाचे प्रमुखपद सांभाळले आहे. अंतरिम सरकारकडे मोठे निर्णय घेण्याचे फारसे अधिकार नसतात. फक्त नवे सरकार सत्तेत येईपर्यंत त्यांना सत्ता सांभाळावी लागते.
'जब सीमा पे जनाजे उठ रहे हो, तो बातचीत की आवाज अच्छी नही लगती'; सुषमांची पाकला चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 4:54 PM