पूंछ : अतिवृष्टी व कमी दृश्यमानतेचा फायदा घेत दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ भागात लष्करी वाहनावर हल्ला केला. त्यात ५ जवान शहीद झाले. या घटनेत आणखी एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला राजौरी येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
‘गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछदरम्यान जात असलेल्या लष्कराच्या ट्रकवर मुसळधार पाऊस आणि परिसरात अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी ट्रकवर बॉम्ब टाकल्यामुळे आग लागली असावी, असे उत्तरी कमांडच्या मुख्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. पाचही शहीद जवान राष्ट्रीय रायफल्सचे होते. घटना घडली ते ठिकाण पूंछपासून ९० किलोमीटर अंतरावर आहे. शहीद झालेले जवान राष्ट्रीय रायफल्स युनिटचे होते. हल्ला ज्या ठिकाणी झाला, तेथे गेल्या वर्षी दहशतवाद्यांसोबत मोठी चकमक झाली होती. या ठिकाणी आजूबाजूला घनदाट जंगल आहे.
पीएएफएफने स्वीकारली जबाबदारी- पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहंमद’ या अतिरेकी संघटनेचे पाठबळ असलेल्या ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ (पीएएफएफ) या संघटनेने लष्करी वाहनावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे. - या हल्ल्याबद्दल लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना माहिती दिली आहे. हल्ला करणारे चार अतिरेकी होते आणि त्यांनी तीन बाजूंनी हल्ला केला होता, असे वृत्त आहे.दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या हल्ल्याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. वीज कोसळल्यामुळे वाहनाने पेट घेतल्याचा अंदाज सुरुवातीला होता. मात्र, घटनास्थळी लष्कराचे पथक पोहोचल्यानंतर हा दहशतवादी हल्ला असू शकतो, असा अंदाज वर्तविला. (वृत्तसंस्था)