चंडीगड - शिख समुदायाचं पवित्र स्थान असलेल्या करतारपूरसाठी भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये कॉरिडोर मार्ग खुला होण्यासाठी एक आठवडा बाकी आहे. याठिकाणी हजारो शिख बांधव पाकिस्तानच्या सीमेत असलेल्या करतारपूर येथे गुरुद्वाराच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र याच करतारपूरमध्ये दहशतवाद्यांनी त्याचं बस्तान बांधल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.
गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या सीमेलगत असणाऱ्या पाकिस्तानी पंजाबमधील नारोवाल जिल्ह्यात दहशतवादी हालचाली होत असल्याची माहिती आहे. याच जिल्ह्यात करतारपूर गुरुद्वारा आहे. भारतीय शिख बांधवांसाठी करतारपूरला जाण्यासाठी भारत-पाकदरम्यान कॉरिडोर बनविण्यात आला आहे. याचं उद्धाटन येत्या आठवडाभरात होईल. मात्र यापूर्वीच गुप्तचर यंत्रणांना ही महत्वाची माहिती प्राप्त झाली आहे.
हा कॉरिडोर भारताच्या पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यातील करतारपूर साहिब या गुरुद्वारेला जोडण्यात आलेला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दावा केला आहे की, पाकिस्तानातील पंजाबमधील मुरिदके, शाकरगड आणि नारोवाल याठिकाणी दहशतवादी हालचाली वाढल्या आहेत. याठिकाणी दहशतवादी कॅम्प असण्याची शक्यता आहे त्याच महिला, पुरुष दहशतवादाचं ट्रेनिंग घेत आहे.
ही माहिती देशातील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीतून समोर आली. करतारपूर कॉरिडोरच्या माध्यमातून दहशतवादी भारताविरोधी कृत्यासाठी उपयोग करतील. तसेच ड्रग्स स्मगलर्स या मार्गाचा वापर करण्याची शक्यता आहे. अशी शक्यता या बैठकीत वर्तविण्यात आली आहे. पंजाब सीमेवर सुरक्षेसाठी तैनात करणाऱ्या एजन्सीने पंजाबमध्ये पाकिस्तानी सिमकार्डसचा वापर आणि नेटवर्क वापरण्यावर बंदी आणली आहे. तसेच भारताविरोधातील हालचालींवर सुरक्षा यंत्रणा नजर ठेऊन आहेत.