नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरविल्याप्रकरणी (टेरर फंडिंग) राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला बुधवारी अटक केली. त्यानंतर त्याला दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची कडक पोलीस सुरक्षा व्यवस्थेत तिहार तुरुंगात रवानगी केली आहे.
यासिन मलिकच्या चौकशीसाठी एनआयएच्या विशेष न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर त्याला दिल्लीत आणण्यात आले. यासिन मलिकला गेल्या महिन्यात अटक करून त्याची रवानगी जम्मूतील कोट बलवाल तुरुंगात करण्यात आली होती. मात्र, आता यासिन मलिकचा ताबा घेत एनआयएने घेतल्यानंतर त्याला दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याची 22 एप्रिलपर्यंत कडक पोलीस सुरक्षा व्यवस्थेत तिहार तुरुंगात रवानगी केली आहे.
यासिन मलिकच्या जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटवर (जेकेएलएफ) केंद्र सरकारने गेल्या महिन्यात बंदी घातली आहे. त्याच्यावर सीबीआयने दोन खटले दाखल केले आहेत. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैया सईद हिचे 1989 मध्ये अपहरण आणि 1990 मध्ये भारतीय हवाई दलाच्या 4 कर्मचाऱ्यांची कथितरित्या हत्या केल्याचा यासिन मलिकवर आरोप आहे.