जम्मू-काश्मीर सरकारनं आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद सलाऊद्दीन याच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरीवरुन निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवाद्यांशी हितसंबंध आणि वित्त पुरवठ्याच्या आरोपांवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. दशतवाद वित्तपुरवठ्यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) तपास सुरू आहे. यात सलाउद्दीनच्या मुलांच्या विरोधात काही सबळ पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्याच्या मुलांना जम्मू-काश्मीर सरकारनं सरकारी नोकरीवरुन काढून टाकलं आहे.
आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद सलाऊद्दीनच्या सय्यद शकील अहमद आणि शादिर युसूफ या दोन मुलांसोबत आणखी ९ सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. सय्यद सलाऊद्दीनचा मुलगा शकील अहमद श्रीनगरच्या शेरे काश्मीर इंन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये कार्यरत होता. तर दुसरा मुलगा शाहिद युसूफ श्रीनगरच्या कृषी विभागात काम करत होता.
जम्मू-काश्मीर सरकरानं एकूण ११ जणांना नोकरीवरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यात सर्वाधिक ४ कर्मचारी हे अनंतनाग येथील आहे. याशिवाय ३ जणं बडगाम आणि प्रत्येकी एक कर्मचारी पुलवामा व बारामुल्ला येथील आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाऊद्दीन २०१७ सालापासून अमेरिकेच्या मोस्ट वॉण्टेड यादीत सामील आहे.
एनआयएकडून सुरू असलेल्या तपासात आणि छापेमारीत आरोपींच्या विरोधात काही सबळ पुरावे हाती लागले आहेत. यात दहशतवाद्यांना वित्त पुरवठा केल्यासंदर्भातील काही धागेदोरे एनआयएच्या हाती लागलेत. यापुढे या ११ आरोपींवर नेमकी कोणती कारवाई केली जाणार याबाबत कोणती माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.