जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागात रविवारी संध्याकाळी परप्रांतीय मजुरांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या स्थलांतरित मजुरांची संख्या दोनवरून तीन झाली आहे. हा हल्ला बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याजवळ झाला. परिसर सुरक्षित करण्यासाठी आणि तपास सुरू करण्यासाठी सुरक्षा दलाच्या अधिक तुकड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
प्राथमिक तपासात समोर आलं की, ज्या कामगारांवर हल्ला झाला ते झेड मोड बोगद्यासाठी काम करणाऱ्या बांधकाम टीमचा भाग होते, जे मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील गगनीर ते सोनमर्गला जोडणार आहे. सुरक्षा दलाचे पथक हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले असून त्यांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी या परिसराची नाकेबंदी केली आहे.
या गोळीबारावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली. "सोनमर्ग परिसरातील गगनीर येथे परप्रांतीय मजूरांवर भ्याड हल्ला ही अत्यंत दु:खद बातमी आहे. हे लोक परिसरातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पावर काम करत होते. या दहशतवादी हल्ल्यात २ जण ठार झाले आहेत आणि २-३ जण जखमी झाले आहेत. नि:शस्त्र निष्पाप लोकांवरील या हल्ल्याचा निषेध करतो आणि त्यांच्या कुटुंबाप्रती मी शोक व्यक्त करतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
गांदरबल गोळीबारातील मजूरांची नावे
गगनगीरमधील दहशतवादी गोळीबारातील पाच जखमींना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, ज्यात पंजाबमधील गुरमीत सिंगचा मृत्यू झाला होता. या व्यतिरिक्त एक मजूर बिहारचा तर इतर तिघे स्थानिक आहेत.
गुरमीत सिंग, पंजाब, वय ३० वर्षे.
गरीब दास, बिहार, वय ३५ वर्ष सोमनाथ, कठुआ, वय ३० वर्षे
जहूर अहमद लोन, प्रेंग कंगन, वय २६ वर्षे.
सुरा सिंग, कठुआ, वय ३० वर्षे.
२ दिवसांपूर्वी बिहारमधील मजुराची हत्या
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बिहारमधील एका स्थलांतरित मजुराची दहशतवाद्यांनी हत्या केल्याच्या दोन दिवसानंतर ही घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी स्थानिक लोकांनी रस्त्याच्या कडेला मृतदेह पाहिला आणि त्यानंतर मजुराची ओळख पटली. त्याला तातडीने जवळच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला.