- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या निर्भया प्रकरणातील आरोपी विनय शर्माने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विनय शर्मा तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असून जेलमध्येच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मफलरने गळफास लावून आत्महत्या करण्याचा त्याने प्रयत्न केला. दीनदयाळ रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे.
दिल्लीत 2012 मध्ये चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. क्रूरतेची परिसीमा गाठणा-या या घटनेतनंतर पीडित तरुणीचा मृत्यू झाला होता. देशभरातून या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त करण्यात आला होता. लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. न्यायालयाने याप्रकरणी आरोपी विनय शर्माला फाशीची शिक्षा सुनावली होती.
विनय शर्मा तिहार जेलमधील आठ क्रमांकाच्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं. बुधवारी रात्री त्याने काही गोळ्या खाल्ल्या आणि त्यानंतर मफलरच्या सहाय्याने आत्महत्येचा प्रयत्न केला अशी माहिती मिळाली आहे.
आरोपी विनय शर्माने गतवर्षी जेलमध्ये आपल्या सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होता. काही कैदी आणि पोलीस आपला शारिरीक छळ करत असल्याचा आरोप त्याने केला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे निर्भया प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंग याचादेखील तिहार जेलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. 11 मार्च 2013 त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.
निर्भया प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला तीन वर्षांच्या कारावासानंतर सोडण्यात आलं. तर चौघा दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र त्यापैकी एकाने आत्महत्या केली.