नवी दिल्ली - रुग्णालयातील भोंगळ कारभाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक घटना आता घडली आहे. तेलंगणातील एका मोठ्या सरकारी रुग्णालयात निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. गुरुवारी रुग्णालयात एका रुग्णाला उंदीर चावला. राज्यातील प्रमुख सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या एमजीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) ही धक्कादायक घटना घडली आहे. श्रीनिवास नावाच्या एका रुग्णाचे हात-पाय उंदराने कुरतडले. त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. या व्यक्तीवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
रुग्णाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णावर यापूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि मात्र तिथे होणारा भरमसाठी खर्च उचलण्यास ते असमर्थ होते. त्यांनी चार दिवसांपूर्वी त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल केलं. पहिल्याच दिवशी उंदीर चावल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्यांनी हे रुग्णालयातील कर्मचार्यांच्या निदर्शनास आणून दिले, ज्यांनी त्यांच्यावर उपचार केले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी पुन्हा उंदरांनी चावा घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रुग्णाचा भाऊ श्रीकांत याने सांगितले की, बेडवर रक्त पाहून मला धक्काच बसला. उंदरांनी त्याची हाताची बोटे आणि पाय कुरतडले. त्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता, त्यांनी त्याला विचारले की, तुम्ही काय करत आहात. रक्ताच्या कमतरतेमुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. काही कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की, यापूर्वीही अशा घटना घडल्या असून त्यांनी आवश्यक कारवाईसाठी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली आहे.
निवासी वैद्यकीय अधिकारी मुरली यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालय परिसरात उंदरांच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलेल. एमजीएम कॅम्पसमध्ये अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षांपूर्वी शवगृहात उंदीर मृतदेह कुरतडत असल्याचं आढळून आलं होतं. आयसीयूसह संपूर्ण कॅम्पसमध्ये आता उंदरांचा धोका असल्याने रुग्ण चिंतेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.