Man Eater Tiger: उत्तराखंडच्या पौरी जिल्ह्यात वाघाने आठवडाभरात आणखी एका व्यक्तीचा बळी घेतल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. वाघाच्या हल्ल्यामुळे मुलांनी शाळेत जाणे बंद केले आहे. याशिवाय 25 गावांमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जंगलात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पौरी जिल्ह्यातील रिखानिखल परिसरात तीन दिवसांत वाघाने दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेतला. यावेळी वाघाने एका 75 वर्षीय व्यक्तीला ठार मारले. यामुळे अधिकाऱ्यांना 25 गावांमध्ये रात्रीचा कर्फ्यू लावावा लागला. डीएम आशिष चौहान म्हणाले की, 25 गावांमध्ये संध्याकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिसरातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रेही मंगळवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वन रेंजर महेंद्र सिंह रावत यांनी सांगितले की, रविवारी गावकऱ्यांना रणवीर सिंह नेगीचा अर्धा खाल्लेला मृतदेह आढळला. नेगी शनिवारपासून डेहराडूनमधील त्यांच्या नातेवाईकांच्या फोन कॉलला उत्तर देत नव्हते. नातेवाइकांनी या प्रकरणाची माहिती ग्रामस्थांना दिली व जाऊन पाहण्यास सांगितले. घरापासून 150 मीटर अंतरावर मृतदेह आढळला. परिसरात तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे.
वाघाला मानवभक्षक घोषित करण्याची विनंतीवाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे वन रेंजर रावत यांनी सांगितले. दुसरीकडे कोटद्वारचे आमदार दिलीप सिंह कुंवर यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना वाघाला मानवभक्षक घोषित करण्याची विनंती केली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, वाघाला पकडण्यासाठी गावात पिंजरा लावण्यात आला आहे.