उत्तर प्रदेशमधील गुंडाराज संपवण्याचा चंग योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने बांधला आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही केले जात असून युपीतील पोलिसांकडून गुंडांवर, दहशत माजवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही प्रकरणांत युपी पोलिसांनी थेट एन्काऊंटर करुन आरोपींना मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा दिलीय. त्यामुळे, येथील गुंडांमध्ये पोलिसांची आणि सरकारचा चागंलाच जरब बसल्याचं पाहायला मिळालं. एका आरोपीने भररस्त्यात पोलिसांना लेखीच मागितलं की, माझा तुम्ही एन्काऊंटर करणार नाहीत.
आरोपीने पोलिसासोबत हुज्जत घालत भररस्त्यात तमाशा केल्याचं पाहायला मिळालं. तो पोलिसांसोबत जाण्यास तयार नव्हता, कारण आपलाही एन्काऊंटर होईल की काय अशी भीती त्याच्या मनात होती. मला रस्त्यात गोळी मारणार नाही, असे लिहून द्या, अशी मागणीच आरोपीने केली. तसेच, मुख्यमंत्री योगींनी पोलिसांना कोणतं औषध दिलंय की, ते पायावर गोळी मारतात, असेही आरोपीने म्हटले. आरोपी आणि पोलिसांमधील हा संवाद पाहायला रस्त्यात गर्दी जमल्याचंही दिसून आलं.
संबंधित आरोपी हा हरदोई जिल्ह्यातील एका तुरुंगात बंद होता. सोमवारी ट्रामा सेंटवर हा कैद्याने चांगलाच गोंधळ घातला. रिजवान असं या आरोपीचं नाव असून डायलेसीसी साठी त्याला मेडीकल सेंटरमध्ये आणण्यात आलं होतं. मात्र, डायलेसीस करण्यास त्याने नकार दिला, तसेच, मेडिकल सेंटरबाहेर त्याने गोंधळ सुरू केला. पोलिसांकडून आपला एन्काऊंटर होईल, अशी भीती तो बाळगून होता. त्यामुळेच, तो पोलिसांसोबत जाण्यास तयार नव्हता.