ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. १५ - उत्तरप्रदेशमधील दादरी व मणिपुरी येथील हिंसेच्या घटनेनंतर दहशतवादी संघटना पुन्हा सक्रीय झाल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. या हिंसाचाराचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटना विविध शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असून विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया हे दहशतवादी संघटनाच्या हिट लिस्टवर असल्याचे गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे.
गुप्तचर यंत्रणेने उत्तरप्रदेश पोलिसांना पाच पानी अहवाल पाठवला असून या अहवालात उत्तरप्रदेशमधील दादरी व मणिपूरीतील हिंसाचारानंतर दहशतवादी संघटना सक्रीय झाल्याचे म्हटले आहे. दहशतवादी संघटना त्यांचे स्लीपर सेल्स पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न करत असून पंचायत समितीची निवडणूक व सणासुदीच्या काळात अडथळे निर्माण प्रयत्न या दहशतवाद्यांकडून केले जाऊ शकतात असे यात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानंतर उत्तरप्रदेशमधील पोलिस यंत्रणेला हायअलर्टचा इशारा देण्यात आली असून राज्यातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
महिला पोलिसांसाठी हनी ट्रॅप
गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या संभाषणात अलाहाबाद येथील एक व्यक्ती दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्यांना मदत करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महिला पोलिसांनी संघटनेतील पुरुषांनी हनी ट्रॅप केल्याने दहशतवादी कारवायात मदत होईल असा उल्लेख या संभाषणात करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेने अलाहाबादमधून दोघा संशयितांना अटक केली असून या दोघांनी चौकशीत उत्तरप्रदेश विधानसभा, कानपूर स्टेशन, निवृत्त जवानांची निवासी वसाहत आदी ठिकाणी हल्ल्याचा कट होता अशी कबुली या दोघांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.