नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि लष्कराच्या छावणीवरील दहशतवादी हल्ल्याची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी तीव्र शब्दांत निर्भत्सना केली. आमच्या सैनिकांचे शौर्य आणि निश्चयापुढे दहशतवाद, तसेच द्वेष कधीही यशस्वी होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले. त्यांनी टिष्ट्वटरवर लिहिले, ‘बारामुल्ला येथे लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. आमच्या शूर सैनिकांचे साहस आणि निश्चयापुढे दहशतवाद आणि द्वेष यांचा कधीही निभाव लागू शकणार नाही. बारामुल्लात लष्कर आणि निमलष्करी बीएसएफच्या लगत छावण्या आहेत.
या छावण्यांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान शहीद, तर एक जखमी झाला. सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी रात्री राष्ट्रीय रायफल्स आणि बीएसएफच्या छावण्यांवर हल्ला केला. त्यानंतर, सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांत तुफान धुमश्चक्री झाली. जवान आमच्या देशाचे संरक्षण करतात. त्यामुळे मी त्यांच्यासाठी सदैव प्रार्थना करतो. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहिदाला सलाम! असे राहुल गांधी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.