सुरेश डुग्गर
जम्मू : जम्मू-काश्मिरातील दहशतवाद शेवटच्या घटका मोजत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. या प्रदेशाला तीन घराण्यांनी उद्ध्वस्त केले, अशी टीका करताना, या सुंदर क्षेत्रास नष्ट करणाऱ्या वंशवादी राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या सरकारने नवे नेतृत्व उभे केले आहे, असेही मोदी यांनी म्हटले.
जम्मूमधील दोडा जिल्ह्यात भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी रॅलीला संबोधित करताना म्हटले की, ‘तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन जम्मू-काश्मीरला देशाचा एक सुरक्षित व समृद्ध भाग बनवूया.’ जम्मू-काश्मिरात १८ सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील २४ विधानसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी पहिलीच सभा येथे घेतली.
दगडफेक करणारे हात आता बदलासाठी झटताहेत
मोदी यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीरला विदेशी शक्तींनी लक्ष्य केले. त्याचवेळी वंशवादी राजकारणाने या सुंदर प्रदेशास आतून पोखरले.
राजकीय वंशवाद्यांनी आपल्या मुलांना पुढे केले आणि नवीन नेतृत्व उदयास येऊ दिले नाही. तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरला उद्ध्वस्त केले. २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर येताच आम्ही तरुण नेतृत्व कसे उदयास येईल, याकडे लक्ष दिले.
मोदी यांनी म्हटले की, जम्मू-काश्मिरात आता दहशतवाद अंतिम घटका मोजत आहे. जे हात पोलिस व लष्करावर दगडफेक करीत होते, ते आता नवा जम्मू-काश्मीर उभारण्यासाठी झटत आहेत. मागील १० वर्षांत हा बदल झाला आहे.
५० वर्षांत प्रथमच पंतप्रधान डोडामध्ये
५० वर्षांत डोडाला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्याआधी शुक्रवारी केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी कार्यक्रम स्थळाचा आढावा घेतला होता.
जितेंद्रसिंह यांनी सांगितले की, मागील ५० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानाने डोडाचा दौरा केला नाही. मोदींनी दूरवर्ती भागास प्राधान्य दिल्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे.