नवी दिल्ली : जगभरातील गंभीर आव्हानांचा सामना करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्लोबल साउथचे सदस्य असलेल्या देशांना केले. अन्नसुरक्षा, ऊर्जा संकट आणि दहशतवादासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त करतानाच जगभरातील अनिश्चिततेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीच्या उद्घाटनाप्रसंगी मोदी बोलत होते. भारत सरकारने डिजिटल पद्धतीने ही परिषद आयोजित केली आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या उद्देशाने ‘सोशल इम्पॅक्ट फंड’मध्ये भारत सरकार २५ दशलक्ष डॉलर्सचे प्रारंभिक योगदान देणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
परस्पर व्यापार, व शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ग्लोबल साउथ किंवा विकसनशील देशांसोबत आपली क्षमता सामायिक करण्यास वचनबद्ध आहे. जी-२० परिषदेचा अध्यक्ष असताना, भारताने ग्लोबल साउथ देशांना दिलेले महत्त्व यावेळी मोदींनी अधोरेखित केले.
एकजूट हीच आपली ताकद दहशतवाद, अतिरेकवाद, फुटीरतावादाचा आपल्या समाजाला गंभीर धोका आहे. या धोक्यासोबतच तंत्रज्ञानाचे होणारे विभाजन, तंत्रज्ञानाशी संबंधित नवीन आर्थिक आणि सामाजिक आव्हानेदेखील निर्माण होत आहेत.मात्र, गेल्या शतकात निर्माण झालेले जागतिक प्रशासन व वित्तीय संस्था या शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम नाहीत.आजच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ग्लोबल साउथच्या देशांनी एकजूट होत एकमेकांची ताकद बनणे ही काळाची गरज आहे. आपण सर्वजण आपापल्या अनुभवांची देवाण-घेवाण करण्यासोबत एकत्रितपणे आपले संकल्प पूर्ण करू शकतो. आपण सर्व एकत्र आलो, तर दोन तृतीयांश मानवतेला मान्यता मिळवून देऊ शकतो, असे व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले.
कोरोना महामारीतून जग अद्याप पूर्णपणे सावरलेले नाही. युद्धामुळे विकासाच्या मार्गावर नवनवी आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यामुळे जगावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करत असताना आरोग्य, अन्नसुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा यासंदर्भातही चिंता व्यक्त करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.नरेंद्र मोदी, पंतप्रधान