नवी दिल्ली : देशात सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवाद पसरवण्याचा धोका सध्या खूप जास्त आहे. यामुळे भारताची एकता आणि अखंडतेला धोका असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी म्हटले आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात गृह मंत्रालयाने सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशातून भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जात आहे, ज्यामध्ये कट्टरता ठळकपणे दिसून येते.
सरकारचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा एक दिवस आधी सोमवारी सरकारने पाकिस्तानस्थित ओटीटी प्लॅटफॉर्मची वेबसाइट, दोन मोबाइल अॅप्स, चार सोशल मीडिया खाती आणि स्मार्ट टीव्ही अॅपवर बंदी घालण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. या प्लॅटफॉर्मद्वारे दाखवल्या जाणार्या वेब सीरिजमुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडतेला हानी पोहोचू शकते, असे सरकारने म्हटले आहे.
विडली टीव्हीने 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 'सेवक: द कन्फेशन्स' नावाची वेब सिरीज प्रसिद्ध केली होती, जी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला हानिकारक असल्याचे आढळून आल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले. तसेच, या वेब सिरीजचे आतापर्यंत तीन भाग रिलीज करण्यात आले आहेत, असेही मंत्रालयाने सांगितले.
दरम्यान, मंत्रालयातील वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी ट्विट केले की, पूर्णपणे बनावट वेब सिरीज 'सेवक'चे मूल्यांकन केल्यानंतर पाकिस्तानस्थित विडली टीव्हीवर कारवाई करण्यात आली. वेब सिरीजमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्यानंतरची घटना, अयोध्येतील बाबरी मशिदीचा विध्वंस, ग्रॅहम स्टेन्स नावाच्या ख्रिश्चन मिशनरीची हत्या आणि मालेगाव स्फोट यासह संवेदनशील ऐतिहासिक घटना आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांचे भारतविरोधी चित्रण करण्यात आले आहे.