श्रीनगर - संसदेवर दहशतवादी हल्ला केल्याबद्दल फासावर लटकवण्यात आलेला दहशतवादी अफजल गुरुच्या मुलाने सर्वांसमोर एक आदर्श उभा केला आहे. अफजल गुरुचा मुलगा गालिब अफजल गुरुने 12 वीच्या बोर्ड परिक्षेत डिस्टिंक्शन मिळवलं आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपुर्वी दहावीच्या बोर्ड परिक्षेत गालिबने 95 टक्के मिळवले होते. गुरुवारी सकाळी जम्मू अॅण्ड काश्मीर स्टेट बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनच्या बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. गालिबने 500 पैकी 441 मार्क मिळवले आहेत. त्याने पर्यावरण विज्ञानात 94, केमिस्ट्रीत 89, फिजिक्समध्ये 87, बायोलॉजीमध्ये 85 आणि इंग्लिशमध्ये 86 मार्क्स मिळवले आहेत.
2016 मध्ये इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना गालिबने आपल्याला मेडिकलचा अभ्यास करायचा असून त्यातच करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी तो बोलला होता की, 'मला मेडिकलचा अभ्यास करायचा आहे. मला डॉक्टर होण्याची इच्छा आहे. मी डॉक्टर व्हावं हे माझ्या कुटुंबाचं स्वप्न आहे आणि ते पुर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत करणार'.
विशेष म्हणजे अफजल गुरुदेखील मेडिकलचं शिक्षण घेत होता, पण त्याने मधेच शिक्षण सोडलं होतं. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जेव्हा अफजल गुरुला अटक करण्यात आली होती तेव्हा गालिब फक्त दोन वर्षांचा होता. 2013 मध्ये अफजल गुरुला फाशी देण्यात आली होती.