नवी दिल्लीराष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत गोष्टींमध्ये आता खूप मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे देशात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होणं अशक्य आहे, असं ठाम मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे.
'हिंदूस्तान टाइम्स'ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. राजनाथ यांनी देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला. ''मुंबईवरील हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण या हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. दहशतवादाने त्यावेळी भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलं होतं. मात्र, मला अभिमान आहे की आपल्या सुरक्षा दलाने एकाही दहशतवाद्याला जिवंत परत जाऊ दिलं नाही'', असं राजनाथ म्हणाले.
"देशात गेल्या काही वर्षात राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत मोठे बदल झाले आहेत. त्यातून आम्ही देशातील नागरिकांना ठाम विश्वास नक्कीच देऊ शकतो की देशाची अंतर्गत आणि सीमेवरील सुरक्षा आता भक्कम झाली आहे. देशावर आणखी एक २६/११ सारखा दहशतवादी हल्ला होणं आता अशक्य आहे'', असं राजनाथ यांनी टिच्चून सांगितलं.
केंद्राकडून लष्कराला पूर्णपणे सूट भारताच्या सीमेवर कोणत्याही हालचालीविरोधात संपूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. गलवान खोऱ्यातही भारताने याचंच पालन करत आव्हानला तोंड देत चीनी सैनिकांना मागे हटण्यासाठी भाग पाडलं, असं राजनाथ यांनी सांगितलं.