PM Modi, Terrorist Attack Alert: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहाली दौऱ्यापूर्वी पंजाबमध्ये (Punjab) दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय (ISI)चा पंजाबमध्ये दहशत माजवण्याचा कट असल्याचा संशय असल्याने हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानी (Pakistan) गुप्तचर संस्था ISI ने चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत असल्याचा महत्त्वपूर्ण इशारा भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी जारी केला आहे. त्या अलर्टनुसार चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ला होण्याचा कट असून दहशतवादी बस स्थानकाला लक्ष्य करू शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे अलर्ट जारी करून सर्वत्र कसून तपासणी करण्यात येत आहे.
गुप्तचर यंत्रणांनी राज्य पोलीस, जीआरपी आणि राज्य गुप्तचर संस्थेला आपापसात समन्वय साधून मिळालेल्या माहितीवर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ISI ने पंजाबमध्ये दहशत माजवण्याचा मोठा कट रचल्याची गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने बातमी देण्यात आली आहे. पंजाबमधील दहशतवादी हल्ल्याच्या कटात ISI ने चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्लॅन केल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांना आहे. तसेच, या कटात पंजाबमधील १० बडे आणि महत्त्वाचे नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार त्यांना सुरक्षा देऊ शकते.
यातच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहाली दौऱ्याबाबत एजन्सी अलर्टवर आहेत. देशातील शांतता भंग करण्यासाठी दहशतवादी कट करून घातपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच ज्या लोकांशी ISI चे संबंध आहेत, त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा मागोवा घेऊन अशा लोकांची कसून चौकशी करण्यात येणार आहे.