श्रीनगर: एका बाजूला देश कोरोना संकटाचा सामना करत असताना दुसऱ्या बाजूला काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवाया सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांत कारवायांची संख्या वाढली असून भारतीय सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचे मनसुबे हाणून पाडले जात आहेत. आज दहशतवाद्यांनी काश्मीरच्या सोपोरमध्ये केंद्रीय राखील पोलीस दलाच्या पथकावर हल्ला केला. यामध्ये एका जवानाला वीरमरण आलं. तर आणखी तीन जण जखमी झाले आहेत. त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे.सोपोरमध्ये निगराणी करणाऱ्या सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामध्ये चार जवान आणि एक नागरिक झाला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती एएनआयनं दिली. तर दोन जवानांची प्रकृती गंभीर आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.सीआरपीएफच्या पथकावर हल्ला होताच सुरक्षा दलाची एक अतिरिक्त तुकडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला. सध्या सुरक्षा दलांचं ऑपरेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधील दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. सीमेपलीकडून वारंवार घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे.
काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, दोन गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 10:58 AM