सुरेश एस. डुग्गर
जम्मू - काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. हल्लेखोर दहशतवादी ८ ते १० च्या संख्येतील असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दहशतवाद्यांनी ४० पर्यटकांना घेरुन आधी त्यांची नावे विचारली आणि विशिष्ट धर्मीय नावे असलेल्या पर्यटकांना गोळ्या घातल्या, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या हल्ल्यात नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला.
दिल्ली मुंबईसह देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी घटनास्थळ व परिसराला घेराव घातला व दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू केला. जखमींमध्ये महाराष्ट्रातील माणिक पाटील, रिनो पांडे, एस. बालचंद्र यांचा तसेच गुजरात, ओडिशा, कर्नाटक या राज्यांतील पर्यटकांचाही समावेश आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स भारत दौऱ्यावर आले असताना हा भ्याड हल्ला झाला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, दहशतवाद्यांनी जवळून गोळीबार केला. एका पर्यटकाच्या डोक्यात गोळी लागल्याची माहिती त्याच्या पत्नीने एका वृत्तसंस्थेला दिली. बैसरन घाटी या उंचावरील ठिकाणाहून हेलिकॉप्टरने जखमींना पहलगामला आणण्यात आले.
पर्यटक जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले, नातेवाइकांनी मदतीसाठी फोडला हंबरडादहशतवादी हल्ला झाल्यानंतर जखमी व त्यांच्या नातेवाइकांनी मदतीसाठी हंबरडा फोडल्याचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. काही पर्यटक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अतिशय क्रूर पद्धतीने हा हल्ला करण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. जंगलातून काही दहशतवादी आले व त्यांनी सुमारे ४० पर्यटकांना घेराव घालून अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराला सुरुवात होताच तिथे छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी पलायन केले. मात्र, पर्यटकांना निसटणे शक्य झाले नाही.
या गोळीबारातून बचावलेल्या एका महिलेने सांगितले की, माझ्या नवऱ्याच्या डोक्याला गोळी लागली आहे. तो विशिष्ट धर्माचा असल्यामुळे त्याच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. त्यात अनेक लोक रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर निपचित पडले आहेत. तसेच महिला पर्यटक हंबरडा फोडत त्यांच्या आप्तजनांचा शोध घेताना दिसत होते. काही पर्यटक या हल्ल्यामुळे खूप हादरले होते व स्थानिक त्यांना सावरण्याचा प्रयत्न करीत होते.
पर्यटकांवरील खोऱ्यातील २५ वर्षातील काही हल्ले२००० : अमरनाथ बेस कॅम्पवर दहशतवादी हल्ल्यात ३० पेक्षा अधिक ठार, ६० जखमी२००१ : शेषनाग येथे १३ जण ठार, तर १५ जण जखमी झाले होते.२००२: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला होता. २०१७ : अमरनाथ यात्रेतून परतणाऱ्या ८ यात्रेकरूंवर गोळीबार करण्यात आला.
हा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दहशतवाद्यांचे कोणतेही मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. दहशतवादाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात येईल. नरेंद्र मोदी, पंतप्रधान
टीआरएफने घेतली हल्ल्याची जबाबदारीया हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या 'द रेझिस्टन्स फ्रंट'ने (टीआरएफ) स्वीकारली आहे. या संघटनेने म्हटले आहे की, परप्रांतीय लोक पर्यटक बनून येतात, मग मालकासारखे वागतात. अशा लोकांना धडा शिकविण्यात येईल, असा दर्पोक्ती या संघटनेने केली आहे.
गेल्या वर्षीही हल्ला: काश्मीरमध्ये गेल्या वर्षी राजस्थानच्या एका दाम्पत्यावर गोळीबार झाला होता. १८ मे २०२४ रोजी रात्री दोन ठिकाणी हल्ले झाले. भाजपचे स्थानिक नेते एजाज अहमद शेख यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
भ्याह दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव शब्दात निषेध करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याचे खोटे दावे केंद्र सरकारने करू नये व अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठोस पावले उचलावीत. राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा