ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 5 - काश्मीरमधल्या बंदीपोरामध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे, या हल्ल्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 45व्या बटालियनच्या कॅम्पला लक्ष्य केलं होतं. मात्र जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 4 दहशतवादी ठार झाले आहेत. त्यामुळे लष्करानं आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. तत्पूर्वी 3 जून रोजी लष्कराच्या ताफ्यावर अशाच प्रकारचा दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. तसेच जवळपास चार जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. अनंतनाग येथील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लष्कराचा ताफा राष्ट्रीय महामार्गावरून लोअर मुंडा येथून जात असताना दक्षिण काश्मीरजवळील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हल्ला चढवला", अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिका-याने दिली होती. चार जवान जखमी झाले होते. गंभीररीत्या जखमी झालेले दोन जवान शहीद झाले होते. त्यावेळीही संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होते.