ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दहशतवादी हल्ला होण्याची भीती होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर विजयन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला केरळच्या दौऱ्यावर धोका आहे, याची माहिती आम्हाला गुप्तचर यंत्रणांकडून प्राप्त झाली होती. मात्र त्यावेळी आम्ही ती सार्वजनिक केली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जूनला कोचीतल्या मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी केरळमध्ये आले होते. या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दहशतवादी हल्ल्याची भीती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा अहवाल आम्हाला गुप्तचर यंत्रणांनी दिला होता, असंही पिनराई विजयन यांनी सांगितलं आहे. दरम्यान, याआधी केरळचे पोलीस महासंचालकांनाही केरळच्या दौऱ्यावर आलेल्या मोदींच्या जीविताला धोका पोहोचण्याची माहिती मिळाली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी चोख बंदोबस्तही ठेवला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान टेरर मॉड्युल सक्रिय होते, अशी माहिती केरळच्या पोलीस महासंचालकांनी दिली होती.