नवी दिल्ली- शनिवारी पहाटे जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिलेल्या सतर्कतेचा इशा-यामुळेच पठाणकोट सारखा मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. 9 फेब्रुवारी 2013च्या दिवशीच दहशतवादी अफजल गुरू याला फाशी देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. संसदेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 9 फेब्रुवारी 2013ला दहशतवादी अफझल गुरूला फाशी दिली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना पठाणकोट सारखा हल्ला करण्याच्या तयारीत होती.जम्मूतल्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठी फियादीन प्रशिक्षण दिलेले दहशतवाद्यांचाही जैश-ए-मोहम्मदनं वापर केला आहे. फियादीन हल्ल्यात लष्करी तळांमध्ये घुसून जास्तीत जास्त जवानांना मारण्याचं दहशतवाद्यांचं लक्ष्य असतं. त्यासाठी ते आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून स्वतःलाही उडवून देतात. परंतु गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठा हल्ला टळला आहे. जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी हल्ल्यात 2 अधिकारी (जेसीओ) शहीद झाले असून, 1 मेजर व 1 सुरक्षा जवानाची मुलगी, 5 महिला यांच्यासह 9 जण जखमी झाले होते. हा हल्ला 4 ते 5 अतिरेक्यांनी केला. त्यापैकी 3 जणांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. आणखी 3 दहशतवादी कॅम्पमधील निवासी भागात लपून बसले असून, त्यांचा शोध सुरू आहे. या अतिरेकी हल्ल्यात सुभेदार मदनलाल चौधरी व सुभेदार मोहम्मद अशरफ मीर शहीद झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.पहाटे 5च्या सुमारात काही दहशतवादी गोळीबार करीत कॅम्पमध्ये शिरले आणि तेथील अधिका-यांच्या निवासी भागात घुसले. आत शिरताना त्यांनी जवानांवर गोळीबार केला. दहशतवादी निवासी भागात घुसल्याने जवानांनी या भागाला घेरले. निवासी भागातून लोकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात एक अधिकारी शहीद झाला आणि 5 महिला आणि एका मुलीसह 9 जण जखमी झाले. जखमींमध्ये हवालदार अब्दुल हमीद, लान्स नायक बहादूर सिंह आणि दिवंगत सुभेदार चौधरी यांच्या मुलीचा समावेश आहे. त्यामुळे जम्मूमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमांडो पथकातर्फे ऑपरेशन सुरू आहे. जम्मूत हाय अलर्ट घोषित केला आहे. संसद हल्ल्यातील अफजल गुरुला ९ फेब्रुवारी 2013 रोजी फाशी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर 9 तारखेच्या दरम्यान जैश-ए-मोहम्मदकडून हल्ले होण्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला होता.
गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळेच टळला 'पठाणकोट'सारखा दहशतवादी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 8:22 AM