श्रीनगर, दि. 9- जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून इतर दोन जण जखमी झाले आहेत. रविवारी होणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या बैठकीच्या ठिकाणापासून काही अंतरावरील बस स्थानकात हा हल्ला घडवून आणण्यात आल्याची माहिती आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे.
श्रीनगरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात शनिवारी सकाळी सुरक्षा रक्षकांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे सध्या चार दिवसांच्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे रविवारी त्यांची बैठक ज्या ठिकाणी होणार आहे. बैठकीच्या ठिकाणापासून ५०० यार्डाच्या अंतरावर हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस पथकावर हा हल्ला झाल्याने दहशतवाद्यांनी पोलिसांना टार्गेट करीतच हा हल्ला केला आहे.
राजनाथ सिंह आपल्या दौऱ्यादरम्यान, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोहरा, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती त्याचबरोबर काही व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. या भेटींद्वारे काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.
सोपोरमध्ये जवानांनी एका दहशतवाद्याचा केला खात्मा
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोर परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसराला घेराव घालत तेथे शोधमोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलातील जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या भ्याड हल्ल्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले.