नवी दिल्ली - 26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला दहशतवादी हल्ला पोलिसांच्या सतर्कतेमुळं उधळला गेला आहे. पोलिसांनी मथुरामधून एका संशयिताला अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवशी राजधानी दिल्लीमध्ये मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्याला पोलिसांनी काल रात्री मथुरा जवळील भोपाळ शताब्दीमधून अटक केली.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताची कसून चौकशी केली. त्यावेळी आणखी दोन जण दिल्लीमध्ये लपून बसले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये छापा मारला. पण त्यापूर्वीच दोन संशयितांनी पलायन केलं होतं. 26 जानेवारी रोजी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमात आणि अक्षरधान मंदिरावर हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी रचल्याचे माहितीमधून समोर आलं आहे. त्यामुळं सध्या दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश एटीएस आणि आयबी दोन्ही फरार संशयतीचा शोध घेत आहेत. राजधानी नवी दिल्लीमध्ये संशयित दहशतवादी लपून बसल्यामुळं सुरक्षा यंत्रणा सध्या सर्वस्वी त्यांचा शोध घेण्यामध्ये व्यस्त आहे.
१० देशाचे राष्ट्रप्रमुख राहणार उपस्थित
या प्रजासत्ताक दिनी आसियान देशांच्या सर्व राष्ट्र प्रमुखांना आमंत्रित करणार असल्याची माहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून दिली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की प्रजासत्ताकदिनी एखाद्या परदेशी राष्ट्रप्रमुखाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्याची प्रथा जुनीच असून, यंदा प्रथमच आपण आसियान गटातील तब्बल १० देशाच्या राष्ट्र प्रमुखांना प्रजासत्ताक दिनासाठी बोलवणार आहोत. दरम्यान दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना किंवा आसियान या गटात इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, म्यानमार, व्हिएतनाम, फिलिपिन्स, ब्रुनेई, कंबोडिया आणि लाओस या 10 देशांचा समावेश होतो.