सुरेश एस. डुग्गर
जम्मू :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीवर दहशतवादी हल्ल्यांचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या भागात शेकडो अतिरिक्त लष्करी जवान पाठवले आहेत. दुसरीकडे अनेक ठिकाणी चकमकी सुरू आहेत, तर बऱ्याच ठिकाणी शोध आणि तपास मोहिमा सुरू आहेत.
डोडा आणि किश्तवाड सारख्या भागांत ५ ते ६ हजार अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ड्रोनद्वारे कडक नजर ठेवण्यात येत आहे. दहशतवादी काश्मिरी पंडित, कार्यकर्ते, पर्यटक, बिहार-उत्तर प्रदेशचे नागरिक यांना लक्ष्य करू शकतात, असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले.
हल्ल्यांची वाढती संख्या
जम्मू-काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ले वाढत असल्याचे चित्र आहे.
२००० च्या काळात जम्मूमध्ये दहशतवाद्यांचे खच्चीकरण करण्यात आले त्या भागात हल्ले वाढले आहेत. त्यामुळे जम्मू भागातील वन क्षेत्रात गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलाशिवाय, ग्राम संरक्षण दल (व्हीडीजी) दुसऱ्या टप्प्याचे संरक्षण म्हणून काम करत आहे.
७० जवान शहीद
या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये ४१ अतिरेकी मारले गेले, तर २० सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले. १८ नागरिकांचाही बळी गेला.
जम्मू भागात सुमारे ५० जवान शहीद झाले आहेत.